…..” कर्जतमध्ये पनवेल येथून इंदौर – दौंड एक्सप्रेस मधून राज्य सरकारने बंद केलेल्या विषारी गुटख्याची तस्करी “……
कर्जत रेल्वे स्टेशनवर आर पी एफ जवानांची धडक कारवाई !

दोन आरोपींसह , २ लाखांहून अधिक विषारी गुटखा – पान मसाला जप्त , कर्जतमधील कोण व्यापारी ? होणार चौकशी……
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
कर्जत तालुक्यात अनेक वेळा धाडी टाकून राज्य सरकारने बंद केलेला ” विषारी गुटखा ” पकडल्याचे प्रकरणे असताना पुन्हा एकदा गुटखा तस्करी करणारे ” माफिया ” आता रेल्वे गाड्यांचा वापर करून कर्जत मध्ये गुटखा उतरवत असताना कर्जत रेल्वे स्थानकातील सतर्क आर पी एफ जवानांनी धडक कारवाई करत लाखो रुपयांचा विषारी गुटखा पकडून इंदौर – दौंड एक्सप्रेसमधून गुटखा तस्करीचा पर्दाफाश केला आहे .
कर्जत रेल्वे स्थानक हे ” मुंबई – पुणे ” रेल्वे प्रवासाचे मध्य ठिकाण असल्याने आता पनवेल मार्ग देखील सुरू झाल्याने येथील रेल्वे आर पी एफ जवान व पोलिस यंत्रणा देखील नेहमीच अलर्ट कार्यरत असते . प्रत्येक गाडीवर व संशयितांवर त्यांची बारीक नजर असते . शनिवार दिनांक २१ मार्च २०२६ रोजी आरपीएफचे जवान ” बाबुशा इंगोले व शेषराव खिल्लारे ” हे सकाळी ०७.०० वाजता कर्तव्यावर असताना ट्रेन क्रमांक 22944 डाउन इंदौर – दौंड एक्सप्रेस कर्जत रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ०१ वर सकाळी ०७.१२ वाजता दाखल झाली. ट्रेनची नियमित तपासणी सुरू असताना S-2 डब्यातून दोन व्यक्ती मोठ्या ४ ते ५ बॅगांसह संशयास्पद हालचाली करत उतरताना दिसले. याचा संशय आर पी एफ जवानांनी हेरल्याने त्यांची चौकशी करण्यात आली, मात्र त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाहीत म्हणून त्यांना आर पी एफ ठाण्यात आणण्यात आले. यावेळी कर्तव्यावर असलेल्या ” उपनिरीक्षक प्रतिभा साळुंके ” यांच्या मार्गदर्शनाखाली पंचांसमक्ष तपासणी करण्यात आली. चौकशी दरम्यान त्यांनी त्यांची नावे गोलू कुमार राजेंद्र कुमार (वय 23, रा. कामोठे, पनवेल ), अंकुश कुमार हरी कुमार (वय 21, रा. कामोठे, पनवेल) अशी सांगितली.
त्यानंतर त्यांच्या पाच बॅगांची तपासणी केली असता त्यामध्ये विविध प्रकारचा विषारी गुटखा, पान मसाला व तंबाखू मोठ्या प्रमाणात आढळून आला. यामध्ये राज्य शासनाने बंदी घातलेले विमल, राजश्री, रजनीगंधा, तुलसी जर्दा, V -1 तंबाखू आदी ब्रँडचा समावेश असून एकूण रु. २००७१५ /- किमतीचा माल जप्त करण्यात आला. सदर मुद्देमाल पंचनामा करून आर पी एफ च्या ताब्यात घेण्यात आला , तसेच आरोपींची कर्जत येथील शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यावेळी पुढील कार्यवाहीसाठी महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन विभागाचे ” फूड इन्स्पेक्टर प्रशांत शिंदे ” यांच्याशी संपर्क साधण्यात आला व त्यांच्या सूचनेनुसार आरोपी व जप्त केलेला माल कर्जत रेल्वे पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आला.
या प्रकरणी रेल्वे पोलीस ठाणे कर्जत यांनी CR No. 31/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 123, 275, 223, 3(5) तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 च्या कलम 30(2)(a), 59, 3 अन्वये गुन्हा नोंद केला आहे , तर पुढील तपास ” पोलीस उपनिरीक्षक कड ” यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे . सदरचा विषारी गुटखा कर्जत बाजारपेठेत की अन्य कुठे जाणार होता ? याची चौकशी केल्यावर समजणार असून , त्या माफियांवर देखील कारवाई होणार असल्याने ते तस्कर कोण ? याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे .
या महत्त्वपूर्ण कारवाईत कर्जत रेल्वे स्थानकातील आर पी एफ चे जवान ” बाबुशा इंगोले व शेषराव खिल्लारे ” यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली असून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.




