…..” भिसेगावचा सुजित आणि वाकसचा सिद्धार्थ यांच्या अपघाती निधनाने कर्जत तालुक्यात हळहळ “…..
कर्जत - चौक महामार्गावरील वडविहीर येथे " अपघातात " दोन तरुणांचा मृत्यू !

दोघेही कुटुंबातील एकुलते एक तरुण मुले…..
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
शनिवार दिनांक १३ जून २०२६ ची काळ रात्र दोन कुटुंबातील एकुलत्या एक तरुणांची अखेरची रात्र ठरली . कर्जत – चौक मार्गावरील वडविहीर परिसरात झालेल्या भीषण अपघातात दोन दुचाकी स्वारांचा जागीच मृत्यू झाला. समोरासमोर झालेली धडक इतकी भीषण होती की, दोन्ही चालकांचा गंभीर दुखापतीमुळे मृत्यू झाला. या घटनेत कर्जत तालुक्यातील भिसेगाव येथील सुजित अशोक बोराडे (वय २६) आणि वाकस येथील सिद्धार्थ धनाजी जाधव (वय ३३) यांचा समावेश आहे. अपघातानंतर काही तास कुणालाच याची कल्पना नव्हती , मात्र नंतर अपघाताची खबर लागल्याने खालापूर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले व दोघांना चौक रुग्णालयात नेले असता त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले .त्यामुळे भिसेगाव व वाकस गावात त्यांच्या अकाली निधनाने शोककळा पसरली .

सुजित बोराडे हा आपल्या मित्राला आणण्यासाठी स्प्लेंडर दुचाकीवरून पनवेलच्या दिशेने जात होता , तर त्याचवेळी सिद्धार्थ जाधव हा पल्सर दुचाकीवरून कर्जतच्या दिशेने कामावरून येत होता . शनिवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास वडविहीरजवळ दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली. धडक इतकी जोरात होती की , सुजित याच्या डोक्याला जबरी मार लागला . सुजित बोराडे अविवाहित होता, तर सिद्धार्थ जाधव यांचा दोन वर्षांपूर्वी विवाह झाला होता. या दुर्दैवी घटनेमुळे दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे.

भिसेगाव येथील सुजित बोराडे यांचे वडील अशोक बोराडे यांना एकच महिन्यापूर्वी शरीराला अर्धांगवायू झाला आहे , त्यामुळे कुटुंबातील आधार असलेला सुजित अकाली जाण्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर पसरला आहे . त्याचे अंत्यसंस्कार रविवारी दुपारी १ नंतर भिसेगाव वैकुंठ धाम स्मशानभूमी येथे दुःखद वातावरणात करण्यात आले.




