…..” कर्जत तालुक्यातील कशेळे येथील रहिवासी ” सुनिल सोनावणे ” यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन !
त्यांचा शोकसभा व पुण्यानुमोदनचा कार्यक्रम रविवार दिनांक ३१ मे २०२६ रोजी कर्जतमध्ये !

कुटुंबात व परिसरात हळहळ……
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
कर्जत तालुक्यातील ” कशेळे ” येथे वास्तव्यास असलेले व गेली अनेक वर्षे कशेळे शासकीय रुग्णालयात काम केलेले तर कशेळे सारख्या ग्रामीण भागात प्रथमच टीव्ही केबल नेटवर्किंग द्वारे येथील नागरिकांचे मनोरंजनाचे ” आधारस्तंभ ” राहिलेले ” सुनिल पांडुरंग सोनावणे ” यांचे अल्पशा आजाराने मंगळवार दिनांक १९ मे २०२६ रोजी उपजिल्हा रुग्णालय कर्जत येथे निधन झाले . त्यांच्या अकाली निधनाने त्यांच्या कुटुंबावर व परिसरात हळहळ पसरली आहे . कशेळे परिसरात सामाजिक – धार्मिक क्षेत्रात देखील त्यांचा सहभाग व मदत नेहमीच असल्याने ते सर्वांच्याच परिचयाचे होते.
कर्जत तालुक्यातील बेकरे – माणगाव हे त्यांचे गाव होते . आपल्या वडिलांच्या पांडुरंग नागो सोनावणे यांच्या जागेवर ते अनुकंपा तत्वावर सरकारी दवाखान्यात ” क्लार्क ” या पदावर प्रथम श्रीवर्धन – जसवली व आतापर्यंत कशेळे , अलिबाग , उल्हासनगर येथे कार्यरत होते . हे जबाबदारीचे काम करत असताना त्यांनी अनेक गरजूंना मदत केली आहे. त्यांचा ” सोनी केबल नेटवर्किंगचा ” सुद्धा व्यवसाय होता . २५ वर्षांपूर्वी कशेळे सारख्या ग्रामीण भागात नागरिकांचे मनोरंजन व्हावे , म्हणून पुढाकार घेऊन त्यांनी ” टीव्ही केबल नेटवर्किंग व वायफाय ” सेवा , सहज व सरळ दिली . सध्या ते कर्जत मध्ये जुने एस टी स्टँड परिसरात उद्यम नगर येथे रहात होते . काही दिवस ते आजारी असल्याने घरीच होते . पुढच्या जून महिन्यात ते शासकीय रुग्णालयातील सेवेतून सेवा निवृत्त होणार होते . मात्र काळाने त्यांच्यावर अगोदरच घाला घातला व मंगळवार दिनांक १९ मे २०२६ रोजी रात्री साडेनऊ च्या दरम्यान उपजिल्हा रुग्णालय कर्जत येथे त्यांची प्राणज्योत मावळली.
त्यांचा शोकसभा व पुण्यानुमोदनचा कार्यक्रम रविवार दिनांक ३१ मे २०२६ रोजी उद्यम नगर , शिवसृष्टी अपार्टमेंट सोसायटी हॉल , तळमजला , जुने एस टी स्टँड जवळ गुंडगे रोड , कर्जत येथे सकाळी ११.३० वाजता होणार आहे . पत्रकार सुभाष सोनावणे यांचे ते मोठे बंधू होते . त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी सुषमा , मुलगी जान्हवी , हर्षदा , मुलगा अभिजीत , पुतण्या राहुल व रोहित सोनावणे , तर इतर ही बहीण , मामा , मावशी , काकी , भाचे असा त्यांचा मोठा परिवार आहे .



