……” कर्जत शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी जिगरबाज वाहतूक पोलीस मित्र सज्ज “…….
वरिष्ठ पोलीस निरीक्षक " उमेश पाटील " यांचे अनमोल सहकार्य !

वाहतूक सुरळीत होण्यासाठी ” स्वयंशिस्त ” महत्वाची……
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
अस म्हणतात , शिस्तीने राष्ट्र , राज्य , जिल्हा , तालुका , शहर , गाव मोठे होते , म्हणूनच वाहतूक सुरळीत होण्यासाठी ” स्वयंशिस्त ” महत्वाची असली की , कुठेच वाहतूक कोंडी होणार नाही , असे महत्त्वपूर्ण विधान कर्जत शहरातील कोंडी फोडण्यासाठी स्वयंस्फूर्तीने ” कर्जत वाहतूक पोलीस मित्र ” म्हणून सेवा बजावणारे ज्येष्ठ नागरिक विजय गोखले काका , यांनी व्यक्त केले आहे . कर्जत शहरातून येणारी जाणारी वाहतूक कोंडी फोडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य गोखले काका आणि त्यांची टीम व कर्जत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गेली २ महिन्यांपासून कर्जतमध्ये होत आहे . त्यांच्या या ” अनमोल ” कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे .
कर्जतमध्ये दिवसेंदिवस वाहतूक कोंडी वाढतच चालली होती. विशेषत कर्जत मधील चारफाटा , श्रीराम पुल, श्री छत्रपती संभाजी महाराज चौक, दहिवली येथे खुप वाहतुक कोंडीचा त्रास सर्व वाहन चालक व कर्जतकर नागरिकांना होता. सोशल मीडियावर याबाबत चर्चा होत होती . कर्जत शहर बचाव समिती वर अनेक जणांनी या विषयावर चर्चा केली, चिंता व्यक्त केली. उपाय योजना सुचविल्या. विविध मार्गाने या विषयावर सुचना प्राप्त झाल्या. व्हाॅटसप वर विविध ग्रुप वर या बाबत संताप व राग व्यक्त होत होता. या सर्वांचा विचार करुन , व आदर करुन गोखले काका यांनी याबाबत एक पोस्ट तयार करुन दिनांक ११ डिसेंबर २०२५ रोजी ” कर्जत वाहतूक पोलीस मित्र ” नावाने एक ग्रुप तयार करुन प्रत्यक्ष ” वाहतुक नियंत्रण ” या कामाचे सर्वांना आवाहन केले. यास अनेक नागरिकांचा उत्स्फूर्त पाठींबा मिळाला.
यानंतर कश्या पद्धतीने काम सुरु करावे , यावर चर्चा करणेसाठी उल्हास नदी काठी ” श्री विठ्ठल मूर्ती ” प्रती पंढरपूर आळंदी येथे भेटी गाठी सुरु झाल्या. दिनांक २९ डिसेंबर २०२५ रोजी गोखले काका यांचे नेतृत्वाखाली मा. वरिष्ठ पोलिस निरीक्षक उमेश पाटील यांची भेट घेतली व निवेदन दिले त्यात आम्ही प्रत्यक्ष कामासाठी, मदतीसाठी तयार आहोत. तरी आम्हाला काम करण्याची परवानगी मिळावी , अशी विनंती केली. यावर मा. उमेश पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी समाधान व्यक्त करुन अत्यंत सुंदर मार्गदर्शन केले व सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. ” कर्जत वाहतूक पोलीस मित्र ” म्हणून वरिष्ठांना कळविणे बाबत सकारात्मक प्रतिसाद दिला. प्रत्यक्ष कामाला, मदतीला येणारे सदस्यांचा एक ग्रुप १७ जानेवारी २०२६ रोजी तयार केला. संमतीपत्र तयार करण्याचा मसुदा तयार झाला. या अभियानात सहभागी होणारे सदस्य यांनी संमतीपत्र भरुन देणेबाबत कार्यवाही सुरु झाली. सदस्य संख्या वाढत होती. या कामामध्ये संरक्षण , विशिष्ठ ओळखपत्र , मिळावे यासाठी चर्चा झाली. पोलीस यंत्रणेकडून सदस्य नावे , संख्या , याबाबत चाचपणी झाली. ग्रुप वर व प्रत्यक्ष चर्चा सुरु झाली. आणि दिवस ठरला. दिनांक २४ जानेवारी २०२६ रोजी आमंत्रण मिळालेनुसार श्री. गोखले काका यांचे नेतृत्वाखाली सर्व वाहतूक पोलीस मित्र पोलीस स्टेशन ला पोहचले . साधक बाधक चर्चा होऊन टिम साठी पोलिस मित्र चे जॅकेट , टोपी व शिट्टी मिळाली. त्याच दिवशी म्हणजे दिनांक चारफाटा , श्रीराम पुल व श्री छत्रपती संभाजी महाराज चौक, दहिवली येथे प्रचंड वाहतूक कोंडी झाली असून तुम्ही या क्षणापासून कामाला सुरुवात करावी अशी विनंती /सुचना मिळाली व आम्ही या सामाजिक बांधिलकीने त्या त्या ठिकाणी पोहोचलो व प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. या टीमचा अनुभव संमिश्र होता. अनेक जणांनी कौतुक केले, अनेक जणांनी काळजी घ्या सांगितले. डॉ. आशुतोष कुलकर्णी सरांनी काही ज्येष्ठ नागरिक असल्याने कंपलसरी ” मास्क वापरा ” हा प्रेमाचा सल्ला दिला.
वाहतूक कोंडी ही रस्ता लहान, वाढलेली वर्दळ, थांबायला कोणाला वेळ नाही , सगळ्यांना लवकरात लवकर घरी जाण्याची घाई असल्याचे प्रकर्षाने जाणवते , विविध वाहने मध्ये मध्ये टाकून रस्ता जाम होतो , दोन दोन , तीन तीन लाईंन केल्याने वाहतूक कोंडी होते , काही जण ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात , पण अनेक नागरिक सहकार्य करीत असतात . मात्र वाहतूक सुरळीत होण्यासाठी नागरिकांना ” स्वयंशिस्त ” आवश्यक आहे , असे मत यावेळी गोखले काका सांगतात . असा अनुभव या वाहतूक पोलीस मित्र टीमला आला . पोलिस यंत्रणेवर खुप ताण आहे , संख्या तुलनेत कमी असल्याने वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी खुप धावपळ होते , हे ही जाणवले. पोलिस कर्मचारी, अधिकारी आपले बांधव आहेत व आपण त्यांना कामात थोडी मदत करतो , हे समाधान वेगळेच होते.
गोखले काका हे अतिशय कौशल्याने हे काम टिमच्या सहकार्याने करीत आहेत. सोमवार ते रविवार, कोण सदस्य सकाळी, तर कोण संध्याकाळी काम करणार , हे वेळापत्रक तयार झाले व नियमित पाठपुरावा, मेसेज व प्रत्यक्ष काम नियमितपणे सुरु झाले आहे. पोलिस यंत्रणेनेही या टिमच्या कामाचे समाधान व्यक्त केले आहे. सदस्य संख्या वाढत चालली आहे. आता हे काम नियमितपणे सुरु आहे. प्रत्येक सदस्य आपली सेवा उत्तम देत आहेत. आज या सेवेला दोन महिने पुर्ण झाले आहेत. सध्या खालील पोलिस मित्र चारफाटा , श्रीराम पुल व श्री छत्रपती संभाजी महाराज चौक दहिवली येथे प्रत्यक्ष सेवा देत आहेत . यांत विजय गोखले , विकास चित्ते , सतिश मुसळे , फिरोज शिकलगार , अशोक मोरू घोंगे पाटील , विजय ढेंगे , महेंद्र कर्वे , सौ. प्रमिला पाटील , भरत बामणे , गणेश गवई , अमित गडकरी , सुनिल दळवी , राजेंद्र वैशंपायन , दिनेश कदम , प्रथमेश थोरवे , राव सर , दिनेश घनीका असे १७ सदस्य कार्यरत असून ज्या नागरिकांना या सेवेमध्ये सामिल व्हायचे असेल त्यांनी विकास दादा चित्ते – सदस्य वाहतुक पोलिस मित्र यांना 9270130575 या क्रमांकावर संपर्क करावा , असे आवाहन करण्यात येत आहे . या सेवेचे मात्र सर्वत्र कौतुक होत असताना दिसत आहे .




