Uncategorized

…..” वारकरी संप्रदाय परिवारावर दुःखाचे सावट “……

कर्जतमध्ये वैकुंठवासी ह. भ. प. मारुती दादामहाराज राणे यांचे दुःखद निधन !

दादामहाराज म्हणजे ” छत्रपतींचे ” मूर्तिमंत रायगड दर्शन…..

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – 

” भव्य हिमालय तुमचा आमचा – केवळ आमुचा सह्यकडा , गौरी शंकर उभ्या जगाचा – मनात पूजिन रायगडा ” या उक्तीप्रमाणे छत्रपतींच्या पावन भूमीत बदलत्या समाजाला आध्यात्मिक प्रवाहात ठेवण्यासाठी समाज प्रबोधन आणि अध्यात्म अशा दोन्हीची सांगड वारकरी संप्रदायातील महामेरू , छत्रपतींचे मूर्तिमंत ” रायगड दर्शन ” म्हणजे कर्जत तालुक्यातील हालिवली येथील ” ह. भ. प. मारुती दादामहाराज राणे “. त्यांचे आज मंगळवार दिनांक ६ जानेवारी २०२६ रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आणि वारकरी संप्रदाय परिवारावर ” दुःखाचे सावट ” पसरले .

महाराष्ट्र आणि देशभरात वारकरी संप्रदायाची ” बीजे ” रोवली गेली आहेत . त्यालाही अनेक शाखा आहेत , पण रायगडातील वारकरी संप्रदायाची ” मुहूर्तमेढ ” भक्कम केली ती राणे महाराजांनी . एकेकाळी मराठा समाज वारकरी संप्रदायापासून दुरावत चालला होता. किंचित प्रथा-परंपरा आणि व्यसनाधीन होत होता. तेव्हा पुन्हा पारमार्थिक मार्गावर आणायचे काम राणे महाराजांनी केले. ” गुरुवर्य हभप काशिनाथ महाराज नाटे ” यांच्याशी राणे महाराजांचा संपर्क मोठे बंधू हरिभाऊ महाराज राणे यांच्या माध्यमातून आला. त्याअगोदर ते केवळ भजन कलेत होते , पण हळूहळू तोच मार्ग धरून राणे महाराजांनी कीर्तन सेवा सुरू केली. त्यातच वारीची ओढ लागली आणि साधारणतः १९८५ च्या सुमारास कोकण दिंडीची संकल्पना पुढे आली. त्यावेळी कर्जत – खालापूर – अंबरनाथ यासह ठाणे आणि रायगड जिल्हयातून अनेक वारकरी वारीला जात होते, पण केवळ बसचा प्रवास असल्याने जाऊन येणे एवढेच साध्य होत होते. कोकणदिंडीच्या माध्यमातून राणे महाराजांनी सर्व समाज एकत्र आणायचे कार्य केले. मात्र वर्षभरात इतरही वेळेलाही दर्शनासाठी जाणाऱ्यांची गैरसोय होत होती. त्यासाठी त्यांनी पुढे आळंदी आणि पंढरपूरमध्ये मराठा समाजाची धर्मशाळा उभी केली.

परिसरात मोठ्या प्रमाणात मद्यपी, तंबाखू-गुटखा याचे व्यसन असणारे, नशा करणारे घराघरात दिसत होते. मात्र, राणे महाराजांनी यावर कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. यातून अनेकांनी वारकरी संप्रदायाचा मार्ग स्वीकारून ” अनुग्रह ” केल्याने अनेकांचे प्रपंच मार्गी लागले. आज राणे महाराजांच्या माध्यमातून गावागावांमधून ” अखंड हरिनाम सप्ताह ” होत आहेत. त्यातून अनेक तरुण वारकरी संप्रदायाकडे ओढले जात असून प्रवचन आणि कीर्तन सेवा करताना दिसतात. राणे महाराजांची शिष्य संख्या मोठी आहे. केवळ कर्जत, खालापूरच नव्हे; तर जिल्ह्याच्या बाहेरही असंख्य शिष्य आहेत, यामध्ये कोणताही जातीभेद दिसत नाही. मुस्लीम शिष्यही असल्याचे ते अभिमानाने सांगत होते . श्री विठ्ठलाच्या चरणी कुठलाच भेदभाव नाही म्हणूनच अनेक शिष्य त्यांनी घडवले.

महाराष्ट्राच्या वारीमध्ये कोकण दिंडी ही वेगळी ओळख झाल्याचे दिसते. यांत दादा महाराजांचे अथक प्रयत्न आहेत . तरुणांना त्यांनी अग्रभागी घेऊन कीर्तनातून प्रबोधन केले, व असामाजिक कार्यास विरोध केला . समाज माध्यमे आणि क्रिकेटमुळे समाज बिघडत आहे , काही जण वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून ” राजकारण ” करीत असल्याचे दिसते. घरोघरी वाढदिवस साजरे केले जातात, पण ही पद्धत आपली नाही. त्याच प्रमाणे कोणाच्या निधनानंतर चहा-साखर, उत्तरकार्याला पागोटे अशा चुकीच्या पध्दतीवर त्यांनी आक्षेप घेतला. प्रत्येक गावाच्या वेशीत मद्याची दुकाने, गावाच्या सभोवती फार्महाऊस संस्कृतीतून धांगडधिंगा , याबाबत त्यांनी खंत व्यक्त केली . कीर्तन हे समाज प्रबोधनाचे माध्यम आहे , त्याला उपजीविकेचे साधन झाल्याने त्याला व्यावसायिक स्वरूप आले. यातून स्पर्धा वाढीस लागली आणि समाजमाध्यमांवर वाद होऊ लागले. यावर ते नाराजी व्यक्त करत . दोन तासाच्या कीर्तनातून केवळ दोन मिनिटांचा ” व्हिडीओ एडिट ” करून दाखवला जातो. त्यामुळे दर्शकही अशा स्वयंघोषित प्रबोधन करणारांना भुलत असल्याने नवीन पिढी देखील संभ्रमात असल्याचे राणे महाराज सांगत असत .

सुरुवातीला हाताच्या बोटावर मोजण्याइतके वारकरी सहभागी होत होते; मात्र त्याची संख्या जवळपास पाच हजार वारकरी दिंडीत सहभागी होतात. तेवढाच सहभाग दिंडीच्या स्वागत करणाऱ्यांचा असतो. पायी वारी करताना रस्त्यारस्त्यात कोकणदिंडीला चहा, नाश्ता, भोजन देण्यासाठी दात्यांचा ओघ वाढत आहे , हे बदलत्या सामाजिक कार्यातून दिसते. राणे महाराजांचे हे कार्य असंख्य शिष्य पुढे नेताना दिसतात. आज गावागावांमध्ये होणारे अखंड हरिनाम सप्ताह आणि त्यातून भेदभाव न करता तरुण आणि जेष्ठांचा सहभाग हे राणे महाराजांनी केलेल्या प्रबोधनाच्या कार्याचे इप्सित साध्य झाल्याचे दिसते. त्यांच्या या कार्यामुळेच त्यांना ” रायगड भूषण ” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते . असे हे थोर ” अनमोल रत्न ” आज अनंतात विलीन झाले , मात्र त्यांचे कीर्तनातून त्यांचे ” समाज प्रबोधन ” साऱ्यांना आज ही व पुढे ही होत राहील , हेच त्रिवार सत्य आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!