Uncategorized

……” भिसेगाव अरिहंत अलोकी वसाहतीचा पाणी प्रश्न पेटला “……

पुरेसे पाणी मिळत नसल्याने महिलांनी काढला " हंडा मोर्चा " तर " घोषणाबाजी " करत व्यक्त केला संताप !

वेळोवेळी दुर्लक्ष करणारे ” मुख्याधिकारी तानाजी चव्हाण ” यांची आश्वासनाची खैरात ……

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – 

कर्जत नगर परिषद हद्दीतील भिसेगाव प्रभागातील ” अरिहंत अलोकी ” या वसाहतीच्या कुटुंब धारकांना ” मागणी तेवढा पुरवठा ” या मूलभूत हक्काने मुख्याधिकारी तानाजी चव्हाण हे पाणी पुरवठा करत नसल्याने वारंवार पत्रव्यवहार करून सुद्धा आश्वासनांची खैरात करून पाण्याच्या या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष करणाऱ्या कर्जत नगर परिषदेच्या पाणी खात्याच्या ढोबळ कारभाराचा संताप व्यक्त करण्यासाठी आज सोमवार दिनांक २३ मार्च २०२६ रोजी ” संतप्त हंडा मोर्चा ” काढत व जोरदार ” घोषणाबाजी ” करत अरिहंत अलोकी वसाहतीतील महिलांनी कर्जत नगर परिषदेवर धडक देत संताप व्यक्त केला . पुरेसे पाणी मिळत नसल्याने आपली व्यथा मांडण्यासाठी गेलेल्या अरिहंत अलोकी वसाहतीच्या नागरिकांना मात्र नगराध्यक्षा सौ पुष्पाताई दगडे व पाणी पुरवठा सभापती सौ. सुचिता खोत यांची मात्र दुपारी १.३० वाजेपर्यंत भेट झाली नाही . 

     

  यावेळी अरिहंत अलोकी वसाहतीचे ” सेक्रेटरी किरण मोरे ” यांनी मुख्याधिकारी तानाजी चव्हाण व उपनगराध्यक्ष संतोष दादा पाटील यांच्या समोर व्यथा मांडली . तुम्ही जर पुरेसे पाणी देण्यास असमर्थ असाल तर आमची पाणी पट्टी घेऊ नका , रद्द करा , अशी जोरदार मागणी केली . १ तास पाणी सोडता पण पाणी कित्ती फोर्सने असते ? ते किती लिटर पडते ? याचा अभ्यास केलात का ? असा संतप्त सवाल सेक्रेटरी किरण मोरे व इतर महिलांनी विचारल्यावर जेवढे टाकीत पाणी असेल ते भिसेगावातील सर्व नागरिकांना पुरवणे हे माझे काम आहे , असे मोघम उत्तर देऊन , पुरेसे पाणी सर्वांना मिळण्यासाठी नक्कीच प्रयत्न केले जातील , अशी आश्वासनाची खैरात केल्यावर , पुरेसे पाणी मिळत नसल्याने महिना २ लाख रुपयांचे पाणी आम्ही टँकरने घेतो , म्हणून एकतर तुम्ही ज्या मापकाप्रमाणे पाणी पट्टी घेता तेव्हढे पाणी द्या , ते ही जमत नसेल तर टँकरने पाणी पुरवठा करा , व आमच्या पाणी पट्टी माफ करा , अशी जोरदार मागणी करत मुख्याधिकारी तानाजी चव्हाण यांच्या खोट्या आश्वासनाचा महिलांनी जोरदार संताप व्यक्त केला .

          याप्रसंगी अरिहंत अलोकी वसाहतीतील रहिवाश्यांनी खालील मागण्या केल्या आहेत . १) आम्हाला पुरेसा पाणीपुरवठा केला जात नसल्यामुळे , नगरपरिषदेला पूर्ण पाणीपट्टी वसूल करण्याचा अधिकार राहत नाही , त्यामुळे आमची संपूर्ण पाणीपट्टी माफ करण्यात यावी. २) आम्हाला जितका प्रत्यक्ष पाणीपुरवठा केला जात आहे, त्यानुसारच आम्ही पाणी बिल भरण्यास तयार आहोत. यासाठी प्रत्येक कनेक्शनवर तात्काळ पाण्याचे मीटर बसवून मीटर नुसारच बिल आकारण्यात यावे. ३) अरिहंत अलोकी येथील A2 व B2 बिल्डिंगचे पाण्याचे कनेक्शन तोडण्याबाबत देण्यात आलेली नोटीस तात्काळ मागे घेण्यात यावी. ४) आमचे पूर्वी तोडण्यात आलेले ३५ पाण्याचे कनेक्शन तात्काळ पूर्ववत सुरू करण्यात यावेत. ५) सध्या आम्हाला दररोज सुमारे ६० हजार लिटर पाण्याची कमतरता भासत असून ती आम्ही खाजगी पाण्याचे टँकर मागवून पूर्ण करत आहोत. यासाठी दरमहा अंदाजे दीड ते दोन लाख रुपये खर्च येत आहे. नगरपरिषदेकडून नियमित पाणीपुरवठा होत नसल्यास, हा संपूर्ण टँकर खर्च नगरपरिषदेकडून देण्यात यावा किंवा पर्यायाने नगरपरिषदेमार्फत नियमित टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात यावा. या वरील मागण्या तात्काळ पूर्ण न झाल्यास सर्व अरिहंत अलोकी येथील रहिवासी तीव्र आंदोलन करतील , असा इशारा याप्रसंगी अरिहंत अलोकी वसाहतीतील नागरिकांनी दिला . 

       

 या हंडा मोर्चात अरिहंत अलोकी वसाहतीचे सेक्रेटरी किरण मोरे व हरिश्चंद्र गरुड , शकिला पॉल , संजना जगताप , आरती शिंदे , वैजयंता गरुड , सुनिता काटे , स्मिता मोरे , सपना गुप्ता , रोहिणी शेवाळे , ममता गरुड , सुगंधा जळगावकर , श्री व सौ डीएगो तसेच वसाहतीचे मॅनेजर अजय कडवे , ईश्वर भालेराव आदी उपस्थित होते .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!