…..” सार्वजनिक रक्त दाते राजाभाऊ कोठारी सर व नाट्य कलावंत प्रदिप गोगटे यांना सन्मानित “……
" कोकण ज्ञानपीठ कर्जत कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचा " स्तुत्य उपक्रम !

अनेकांचे ” प्राण ” वाचवणारा अमृत तुल्य संजीवनी वृक्ष तर अभिनयाच्या दुनियेतील ” मूर्तिमंत ” नटसम्राट……
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
नुकतेच कोकण ज्ञानपीठ कर्जत कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाने ” सार्वजनिक रक्तदाते तथा महा रक्तवीर व नव निर्वाचित नगरसेवक राजाभाऊ कोठारी सर व नाट्य कलावंत प्रदिप गोगटे ” यांना सन्मानित केले आहे . कर्जतच्या सर्वांगीण सामाजिक आणि नाट्य जगतातील इतिहासात या दोन रत्नांनी ” न भूतो – न भविष्यती ” अशी कामगिरी केली असल्याने त्यांच्या कार्याचा गौरव केला . कोकण ज्ञानपीठ कर्जत कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या इतिहास विभाग अंतर्गत संपूर्ण महाविद्यालयासाठी स्थापन झालेल्या ” हेरिटेज क्लब ” च्या माध्यमातून शुक्रवार दिनांक २७ फेब्रुवारी २०२६ रोजी ” ऐतिहासिक व्याख्यान व ज्ञानवर्धन ” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने दोन विशेष व्यक्तींचा सत्कार सोहळा कोकण ज्ञानपीठ कर्जत रायगड संस्थेच्या वतीने आयोजित केला होता . याप्रसंगी सर्व मान्यवरांच्या हस्ते कर्जत मधील सुप्रसिद्ध रक्तदाते ज्यांनी रायगड जिल्ह्यात व महाराष्ट्रात आजपर्यंत ३० वर्षात जवळजवळ ५३४ रक्तदान शिबिरे आयोजित करून ६४ हजार १७१ रक्त पिशव्या जमा करून या सामाजिक क्षेत्रात एक वेगळा रेकॉर्ड केला तर आहेच , त्यांच्या या कार्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या वतीने त्यांना सन्मानित करण्यात आले तसेच त्यांच्या कार्याची दखल घेऊन कर्जत नगरपालिकेने त्यांची ” स्वीकृत नगरसेवक ” पदी नियुक्ती केली. संस्था स्थापन झाल्यापासून त्यांनी कायम याबाबत संस्थेला सहकार्य केले त्यांच्या योगदानाबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला . त्याचबरोबर नाट्य व अभिनय क्षेत्रात सातत्य राखून विविध व्यावसायिक नाटकात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलेले महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी ” श्री प्रदीप गोगटे ” यांचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा मराठी चित्रपट ” लाडू ” हा लवकरच प्रदर्शित होत आहे तसेच त्यांना या क्षेत्रात अनेक पुरस्कारांनी आजपर्यंत सन्मानित करण्यात आले त्यामुळे संस्थेच्या वतीने त्यांचाही सत्कार करण्यात आला.
दोन्ही सत्कारमूर्तींनी आपल्या मनोगतात त्यांचा प्रवास मांडून महाविद्यालयाचे आभार मानले. यानंतर कोकण ज्ञानपीठ संस्थेचे उपाध्यक्ष व इतिहास प्रेमी श्री प्रकाशजी मुथासाहेब यांचे ” हिंदुस्थानातील बलशाली राजवटी व त्यांची धर्मनिरपेक्षता ” या ऐतिहासिक विषयावर प्रभावी असे व्याख्यान झाले . या व्याख्यानात त्यांनी राणा संग, उदय सिंग, पृथ्वीराज चव्हाण, महाराणा प्रताप ते छत्रपती शिवाजी महाराज या पराक्रमी राजांचा इतिहास सांगून त्यांनी आपल्या साम्राज्यात हिंदू व मुस्लिम असा भेदभाव न करता सर्वांना सामावून कसे घेतले ? आणि अशा धर्म निरपेक्षतेची आजच्या काळात कशी गरज आहे ? यावर आपल्या व्याख्यानातून प्रकाश टाकला.
या कार्यक्रमास कोकण ज्ञानपीठ संस्थेचे सचिव व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री प्रदीपचंद्र शृंगारपुरे, संस्थेचे खजिनदार श्री झुलकरनैन डाभिया, कोकण ज्ञानपीठ अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विलास पिल्लेवान, कोकण ज्ञानपीठ फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन काळे, कोकण ज्ञानपीठ कर्जत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामचंद्र गायकवाड तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने या सोहळ्यास उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हेरिटेज क्लबचे अध्यक्ष डॉ. जितेंद्र भामरे तसेच सदस्य प्रा. रवींद्र कटके आणि डॉ. गंगाधर शिंदे यांनी विशेष मेहनत घेतली .




