……” कर्जत तालुक्यात महायुतीचा दारुण पराभव , शिवसेनेला आत्मचिंतनाची गरज “…..
निवडणुकीत प्रचारात देखील पिछाडी.....

पराभवाला महायुतीच्या पक्षातील कार्यकर्त्यांच्या ” मनोमिलनाचा ” अभाव !
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
कर्जत तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत महायुतीचा ” दारुण पराभव ” झाल्याने प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेनेला व त्या पक्षाचे विद्यमान आमदार ” महेंद्र शेठ थोरवे ” यांना ” आत्मचिंतन ” करण्याची गरज येवून ठेपली आहे . महायुतीत सामील असलेल्या पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचे व कार्यकर्त्यांच्या ” मनोमिलनाचा ” अभावामुळे महायुती सपशेल ” अपयशी ” ठरली असून , आखलेले ” मनसुबे व व्युहरचना ” धुळीला मिळाली आहे .
कर्जत तालुक्यात महायुतीला सहा जिल्हा परिषद जागांपैकी ० जागा मिळाल्या , तर १२ पंचायत समिती जागेवर फक्त २ उमेदवार निवडून आल्याने महायुतीची व प्रामुख्याने शिवसेना शिंदे गटाची हि पिछेहाट झाल्याने यासाठी ” आत्मचिंतन ” करण्याची वेळ का आली ? याचा सारासार विचार करणे , गरजेचे असल्याची चर्चा सध्या कर्जत तालुक्यात आहे . पक्षाने उमेदवारी देताना चूक केली का ? मित्र पक्ष भाजप दुखावला गेला होता का ? जागा वाटप बरोबर झाले का ? भाजपची माणगाव तर्फे वरेडी या गटात ” मैत्रीपूर्ण लढत ” हि योग्य भूमिका होती का ? कार्यकर्त्यांच्या मनधरणीसाठी वरिष्ठांची मध्यस्थी केली होती का ? जागा वाटपामुळे महायुती घोषित करण्यास झालेला विलंब ? भाजप – शेकाप – आर पी आय पदाधिकाऱ्यांचे खऱ्या अर्थाने मनोमिलन झाले होते का ? विकासाचे मुद्दे घेऊन मतदारांपर्यंत पोहचता आले का ? प्रचारात शिवसेनेचे व महायुतीचे पदाधिकारी यांत कमी पडले का ? या सर्व प्रश्नांत महायुतीच्या पराभवाचे ” कारण ” दडले आहे .
महायुतीतील घटक पक्ष असलेल्या भाजपातील एका गटाचे ” स्वबळावर ” निवडणूक लढविण्याचा विचार होता , मात्र दुसऱ्या गटाने शिवसेनेला सहकार्य करत जिथे आपली ताकद आहे फक्त तिथेच उमेदवारी घेतली , मात्र माणगाव तर्फे वरेडी येथे भाजपाने ” एकला चलो ” ची भूमिका घेत स्वबळावर निवडणूक लढवली , ” मैत्रीपूर्ण लढत ” या गोंडस नावाखाली लढत देऊन महायुतीतील उमेदवारा बरोबरच ” झुंझ ” झाल्याने येथे दोन्ही पक्षाची हार झाली व येथे परिवर्तन आघाडीचा उमेदवार विजयी झाला . ” पहिले राष्ट्र – मग पक्ष – व नंतर स्वतः ” हे ध्येय वाक्य असलेल्या भाजप नेत्यांनी येथे चक्क एबी फॉर्म देऊन बसले . याचा परिणाम सर्व तालुक्यात होऊन भाजपची निर्णायक मते महायुतीतील उमेदवाराला मिळाली नाहीत , हे देखील पराभवाचे प्रमुख कारण आहे . आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी आपल्या घरातील उमेदवार म्हणजे त्यांच्या सुनबाई श्वेता प्रसाद थोरवे यांना मोठे वेणगाव गणातून पंचायत समितीची उमेदवारी दिल्याने त्यांचे पती तथा युवा सेना जिल्हाप्रमुख ” प्रसाद थोरवे ” , व शिवसेना नेते तथा माजी उपसभापती ” मनोहर दादा थोरवे ” हे या प्रभागात गुंतून राहिले , त्यामुळे त्यांना इतर प्रभागात लक्ष देता आले नाही , अश्याने प्रचारात पिछाडी झाली . तर तालुका प्रमुख सुदाम दादा पवाळी , हे देखील त्यांची पत्नी संध्या पवाळी यांच्या प्रचारात गुंतले , अमर मिसाळ , सुरेश टोकरे , हे देखील त्यांच्या प्रभागात प्रचारात व्यस्त असल्याने साहजिकच प्रचारात आघाडी घेता आली नाही , त्यातच शेकापचा एक गट ” भाई विलास थोरवे ” यांनी परिवर्तन आघाडीला सहकार्य केले , तर दुसरे नेते ” भाई तानाजी मते ” यांनी महायुतीला सहकार्य केले . त्यामुळे शेकापच्या मतांचे विभाजन झाले , हे देखील पराभवास कारण ठरले . महायुतीतील घटक पक्ष असलेला ” आर पी आय ” पक्षाचा कर्जत नगर परिषद निवडणुकीत पराभव झाल्याने त्यांच्या पदाधिकाऱ्यांचा देखील ” उत्साह ” या निवडणुकीत पाहिजे तसा दिसला नाही . यामुळे याचा देखील मतांच्या बेरजेवर परिणाम झाला . शिवसेनेचे पदाधिकारी यांनी आपल्या पदाला साजेसे काम केले की नाही ? याची देखील चाचपणी करणे गरजेचे असून परिवर्तन विकास आघाडीतील राष्ट्रवादी व ठाकरे सेना या दोन प्रमुख पक्षांची मते देखील मोठ्या प्रमाणात असल्याने हे देखील कारण महायुतीच्या पराभवाला शक्य असू शकते . त्यातच स्वर्गीय ” अजित दादा पवार ” यांच्या अकाली निधनामुळे देखील मतदारांची सहानुभूती मिळाली , हे देखील पराभवाचे कारण असू शकते . तर कर्जत खालापूर मतदार संघाचे माजी आमदार तथा भाजप नेते सुरेश भाऊ लाड देखील या निवडणुकीत प्रचारापासून लांब होते , त्यामुळे त्याचा फटका ही या पराभवात असल्याचे दिसून येत आहे .
रायगडात महाड व अलिबाग येथे राष्ट्रवादीला अपयश आले , तर शिवसेनेला कर्जत मध्ये , मात्र या निकालाने आमदार महेंद्र शेठ थोरवे हे नक्कीच सावध झाले असून या पराभवाची ” आत्मचिंतन बैठक ” लावून भविष्यात पक्ष मजबूत होण्यासाठी ते नक्कीच अधिक प्रयत्न करतील , यांत शंकाच नसेल .



