…..” अखेर सामाजिक कार्याचा सन्मान – दानविराचा बहुमान “…..
स्वीकृत नगरसेवक पदी परिवर्तन विकास आघाडीच्या वतीने " महारक्तवीर राजाभाऊ कोठारी सर " यांची नियुक्ती !

हा सन्मान तमाम कर्जतकरांचा – राजाभाऊ कोठारी सर
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
कर्जत नगर परिषदेवर स्वीकृत नगरसेवक म्हणून परिवर्तन विकास आघाडीचे नेते सुधाकर भाऊ घारे व ठाकरे शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख नितीन दादा सावंत यांच्या शिफारशीनुसार सार्वजनिक रक्तदाते तथा महारक्तवीर ” राजाभाऊ कोठारी सर ” यांची नियुक्ती आज गुरुवार दिनांक १२ फेब्रुवारी २०२६ रोजी पालिकेच्या सभागृहात करण्यात आली .
राजाभाऊ कोठारी सर हे नाव सामाजिक – शैक्षणिक – राजकीय – धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे असे सुवर्ण अक्षरात लिहिण्यासारखे नाव आहे . शिक्षण क्षेत्रात ४२ वर्षे अनेकांचे गुरू राहून ५२०० विद्यार्थी व विद्यार्थिनींना विना मोबदला त्यांनी ज्ञानदानाचे काम केले . आज अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रात उच्चपदस्थ कार्यरत आहे . आरोग्य क्षेत्रात त्यांनी गेली ३७ वर्षे ५३५ च्या वर रक्तदान शिबिरे भरवून अनेकांना जीवनदान दिले आहे . ८ जानेवारी १९८९ पासुन रक्तदान शिबिराचे आयोजन त्यांनी सुरू केले. या सर्व शिबिरातून एकूण ६९५४३ रक्त पिशव्या जमा करण्यात आल्या. आज पर्यंत त्यांनी स्वतः ११३ वेळा रक्तदान केले. आज पर्यंत सुमारे ४५०० पेक्षा जास्त रुग्णांना कमी किमतीत व मोफत रक्त उपलब्ध करुन त्यांनी अनेकांचे जीव वाचविले आहेत .
आज पर्यंत महाराष्ट्र राज्य रक्त संक्रमण परिषद तर्फे एकूण १६ वेळा सन्मान होवून गौरव पुरस्काराने मुंबई येथे सन्मानित करण्यात आले आहे . तर अनेक सामाजिक संस्थेच्या वतीने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे . सन २०२२ मध्ये रायगड जिल्हा परिषदेच्या वतीने ” रायगड भूषण ” पुरस्काराने रायगडच्या तत्कालीन पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या शुभहस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले. तर १९ ऑगस्ट २०२५ रोजी आंतरराष्ट्रीय वैश्य महासंमेलन या संस्थेच्या वतीने दिल्ली येथे ” महारक्तवीर ” या पुरस्काराने मा. कविंद्र गुप्ताजी, महामहिम उपराज्यपाल , लदाख यांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले. नुकताच त्यांचा कर्जत नगर परिषदेने २६ जानेवारी २०२६ रोजी या महान कार्याबद्दल नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ पुष्पाताई हरिश्चंद्र दगडे व मुख्याधिकारी मा.तानाजी चव्हाण यांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले.
स्वीकृत नगरसेवक म्हणून पदग्रहण करताना राजाभाऊ कोठारी सर अत्यंत भावनिक होऊन , हा सन्मान तमाम कर्जतकर नागरिकांचा असून त्यांनी व्यापारी वर्ग , आप्तेष्ट , मित्र परिवार , व परिवर्तन विकास आघाडीचे पदाधिकारी यांचे आभार व्यक्त केले . याप्रसंगी नगराध्यक्षा सौ पुष्पाताई दगडे , मुख्याधिकारी तानाजी चव्हाण , व सर्व नगरसेवक , त्यांची पत्नी , मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते .




