…..” अखेर बहुजन युथ पँथरच्या आंदोलनाच्या इशाऱ्याला यश “…..
कर्जत उपजिल्हा रुग्णालयात महिला रुग्णांच्या समस्या सोडवण्यास प्रशासनाची सुरुवात !

महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी यापुढे घेणार पुढाकार – कोकण प्रदेश महिला अध्यक्षा ” आदिती रमेश ढोके ”
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
राज्यात कुठेही बहुजन समाजावर व महिलांवर होणाऱ्या ” अन्याय – अत्याचाराविरोधात ” त्यांना न्याय देण्यासाठी व शासन – प्रशासनाच्या विरोधात ” दंड थोपटून ” उभे राहून लढाई लढण्याची धिटाई बहुजन युथ पॅंथरचे राष्ट्रीय अध्यक्ष ” भाईसाहेब जाधव ” हे करत आहेत . महिलांना होणाऱ्या समस्या , एका महिला नेतृत्वाखाली सोडवा , असा आदेश घेऊन बहुजन युथ पँथरच्या कोकण प्रदेश महिला अध्यक्षा ” पँथर आदिती ढोके ” यांच्या नेतृत्वाखाली कर्जत उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेण्यासाठी येणाऱ्या कर्जत तालुक्यातील महिलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते , मात्र बहुजन युथ पँथरच्या एका निवेदनाने आरोग्य प्रशासन ” सुतासारखे ” सरळ होत समस्या सोडविल्याने महिलांनी आता सुटकेचा श्वास घेतला आहे .
कर्जत उपजिल्हा रुग्णालयामध्ये खेडोपाड्यातील अनेक महिला उपचारासाठी येत असतात . किरकोळ आजार , गंभीर आजार , गरोदर माता , तर ज्या महिलावर्ग सोनोग्राफीसाठी व उपचारासाठी येत असतात त्यांना होणाऱ्या गैरसोई संदर्भात पँथर आदिती ढोके यांनी प्रशासनाच्या निदर्शनास या समस्या आणून दिल्या होत्या . कर्जत उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक म्हस्कर यांना निवेदनाच्या माध्यमातून दोन दिवसांमध्ये या सर्व समस्या तात्काळ सोडवाव्या , अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा बहुजन युथ पँथरच्या कोकण प्रदेश अध्यक्ष आदिती ढोके यांनी दिला असता , आरोग्य प्रशासनाने त्वरित कार्यवाही करून सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या . या संदर्भात पँथर आदिती ढोके यांनी त्यांच्या सर्व पँथरच्या समवेत उपजिल्हा रुग्णालयात जाऊन पाहणी केली.
उपचारासाठी आलेल्या महिलांशी संवाद साधला असता अध्यक्षा पँथर आदिती ढोके यांनी केलेल्या आंदोलनाचे कौतुक व कामाची पोहोच पावती कर्जत तालुक्यातल्या महिलांनी दिली . तालुक्यातील महिलांसाठी आता महिलांनीच समस्या सोडविण्यास पुढे येऊन पुढाकार घेऊन आंदोलन करण्याची गरज असून तरच प्रशासनाला जाग येऊ शकते , असे मत यावेळी बहुजन युथ पँथरच्या कोकण प्रदेश महिला अध्यक्षा पँथर आदिती ढोके यांनी व्यक्त केले .



