…..” ठेकेदारांनी हात झटकले , अधिकारी लक्ष देत नाहीत “…..
कर्जत तालुक्यातील कशेळे येथे रस्त्यावरील " खड्डे आणि धुळीमुळे " नागरिकांच्या जीवाला धोका !

लवकरच होणार ” तीव्र आंदोलन “, उदय दादा पाटील यांचा इशारा…..
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
कर्जत तालुक्यातील कशेळे येथे कर्जत – कशेळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. विशेषतः कर्जत बाजारपेठ येथील रस्ता पूर्णपणे उखडला आहे. कशेळे नाका , पेज नदी वंजारवाडी या परिसरात अनेक ठिकाणी रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. पेज नदी पुलावरील खड्ड्यामुळे अनेक अपघात झाले असून काही लोकांना जीव गमवावा लागला आहे. या संदर्भात कर्जत तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते आणी पत्रकार यांनी अनेक वेळा आवाज उठवला , परंतु या रस्त्यावर थोडीफार डागडुजी करून ठेकेदारांनी हात झटकले , तर अधिकारी लक्ष देत नाहीत , म्हणूनच संबंधित अधिकारी वर्गाला जागे करण्यासाठी आता जनतेचा संताप अनावर होऊन तीव्र आंदोलन करण्याच्या तयारीत
कशेळे गावातील ग्रामस्थ आणी व्यापारी संघटना यांनी नियोजन केले असून तसे निवेदन त्यांनी msrdc च्या अधिकाऱ्यांना दिले आहे .
येथील रस्ते गणपती काळात उखडले असता स्वखर्चाने कशेळे गाव ते वंजारवाडी पर्यंत मुरूम टाकून खड्डे भरल्याने वाहन चालकांना थोडाफार दिलासा मिळाला होता. परंतु पावसाळ्या नंतर या मुरुमाचा धुरळा होऊन कशेळे बाजार पेठेतील सर्व दुकानात आणी आजूबाजूच्या घरात धूळ उडून नागरिकांना ” श्वसनाचे ” विकार होवून ” जिवाला धोका ” जाणवत आहे . सरकारी दवाखाना परिसरातील खड्ड्यामुळे दवाखान्यात जाणाऱ्या गरोदर महिलांना त्रास होत होता. या बाबत कशेळे ग्रामस्थांनी रस्त्याची दुरुस्ती लवकर व्हावी , या करिता संबंधित अधिकारी यांना ” उपोषणाचा ” ईशारा देखील दिला होता , परंतु या बाबतही सर्वच अधिकारी वर्गाने दुर्लक्ष केले.
म्हणूनच ” झोपेचे सोंग ” घेणाऱ्या या ” बुझगावण्या ” अधिकाऱ्यांचे ” कान ” उपटण्यासाठी सोमवार दिनांक १९ जानेवारी २०२६ रोजी कशेळे येथील सामाजिक कार्यकर्ते उदय दादा पाटील, राजेंद्र हरपूडे , सचिन राणे, पत्रकार दिनेश हरपूडे , विजय शिंदे आणि इतरांनी नरिमन पॉईंट येथील MSRDC चे उपाध्यक्ष ” अनिलकुमार गायकवाड ” यांची भेट घेऊन रस्त्यावरील खड्डया संदर्भात चर्चा करून ते बुजवण्या बाबत विनंती केली असता , गायकवाड या अधिकाऱ्याने या सदर्भात त्वरित उपाय योजना करण्यात येईल , असे सांगून संबंधित अधिकारी वर्गाला सूचना दिल्या. कार्यकारी अभियंता अरुण देवकाते यांनी सदर रस्त्यावरील सर्व खड्डे पंधरा दिवसात बुजवण्याचे आश्वासन दिले आहे , मात्र हे काम पूर्ण न झाल्यास ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल , असा इशारा उदय दादा पाटील यांनी दिला आहे .




