…..” श्री वेताळ देवाचा उत्सव – २०२६ होणार रविवार १ फेब्रुवारी रोजी “…..
भिसेगाव डोंगरावर होणाऱ्या " अमृतमय सोहळ्यास " सर्वांनी सहभागी व्हा !

देवस्थान कमिटी व ग्रामस्थांचे आमंत्रण……
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
कर्जत नगर परिषद हद्दीतील भिसेगाव ग्रामस्थांचे दैवत ” श्री वेताळ देवस्थानचा ” उत्सव सालाबाद प्रमाणे माघ पौर्णिमे निमित्त रविवारी दि. १ फेब्रुवारी २०२६ रोजी श्री वेताळ देवाचा अभिषेक करण्यात येणार आहे . तरी परिसरातील सर्व ग्रामस्थांनी, भाविकांनी कर्जतकर नागरिकांनी या ” अमृतमय सोहळ्यास ” सहभागी होऊन या सोहळ्याचा, दर्शन कार्यक्रमाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आमंत्रण देवस्थान कमिटीने केले आहे .
भिसेगाव येथे पश्चिम दिशेला असणाऱ्या डोंगरावर तर पळसदरी येथे जाणाऱ्या रस्त्यावर असणारे हे ” श्री वेताळ देवस्थान ” पूर्वापार असलेले मंदिर आहे . पूर्वी एका उंबराच्या झाडाखाली हे देवस्थान होते , वर जाण्यासाठी डोंगरावर कच्चा रस्ता होता , ” स्वयंभू ” असलेले हे देवस्थान ” कडक ” असून हा देव ” पावणारा ” असल्याने दर ” अमावास्या व पौर्णिमला ” दर्शन घेण्यासाठी येथे भाविक येत असतात . या देवाला ” भूतनाथ ” किंवा ” आग्या वेताळ ” असे म्हणतात. सफेद रंगाचे कपडे धारण करुन , हातात तलवार , सफेद घोड्यावर स्वार होऊन पंचक्रोशीतील भाविकांचे रक्षण करीत असतो. देवाला पुरणपोळी – दही – भाताचा नैवेद्य दिला जातो. रात्री बारा नंतर श्री वेताळ देव डोंगरावर फिरत असतो ,अशी भाविकांची श्रद्धा आहे. अनेक भाग्यवंतांना त्याचे दर्शन झाल्याचेही काही भाविक सांगतात.
कर्जत नगर परिषदेच्या मा. नगराध्यक्षा सौ. सुवर्णा जोशी व मुख्याधिकारी यांच्या प्रयत्नाने तसेच मा. नगरसेवक सोमनाथ आप्पा ठोंबरे , पोलीस पाटील संजय हजारे यांच्या सहकार्याने निधी मंजूर होऊन येथे सभागृह , डोंगरावर जाण्यासाठी सिमेंट काँक्रीटचा रस्ता , विजेचे पोल , बसण्यास बाकडे , मुलांना खेळण्यास साहित्य बसविण्यात आले आहेत , तर अनेक दानविरांनी मंदिरासाठी लादी , अर्धवट विटांचे बांधकाम वर लोखंडी जाळ्या व पत्र्याचे शेड बनविले आहे . येथे पावसाळ्यात खूपच वारा असल्याने मंदिरात खेळती हवा रहावी म्हणून याठिकाणी अशा प्रकारचे मंदिर आहे . सभोवती वृक्षारोपण केले आहे , तर सौर ऊर्जेवरचे दिवे आहेत , त्यामुळे येथे खूपच प्रसन्न व धार्मिक वातावरण असते . हे देवस्थान अत्यंत कडक व जागृत देवस्थान असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे , म्हणूनच येथे अनेक भाविक दर्शनासाठी येत असतात .

यावर्षी शनिवार दि. ३१ जानेवारी २०२६ , वेळ रात्री ९ वा ” नवनाथ भजनी मंडळ – भिसेगांव ” यांचे जागरण भजन तर रात्री १०.३० वा. जलाभिषेक, मंत्रजप व आरती तसेच रविवार दिनांक १ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९ वा. अभिषेक , सायं. ६ वा. हरिपाठ महिला मंडळ, भिसेगांव , रात्री. ७ वा. महाआरती , महाप्रसाद (जेवण) असा दिवसभर कार्यक्रम असून नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ. पुष्पाताई दगडे व सर्व नगरसेवकांचा सत्कार आयोजित केला आहे , तरी ग्रामस्थ व महिला मंडळ भिसेगांव तसेच श्री वेताळ देवस्थान कमिटीने सर्वांना दर्शन , महाआरती , महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आमंत्रण केले आहे .




