Narendra Patil on Ajit Pawar and Chhagan Bhujbal: अजित पवारांचं टेन्शन आणखी वाढणार? छगन भुजबळांचं नाव घेत नरेंद्र पाटलांचा खळबळजनक आरोप

Narendra Patil on Ajit Pawar and Chhagan Bhujbal: अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री छगन भुजबळ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
Narendra Patil on Ajit Pawar and Chhagan Bhujbal: अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील (Narendra Patil) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. पाटील यांनी असा आरोप केला आहे की, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक (MD) विजयसिंह देशमुख यांनी अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्या सांगण्यानुसार महामंडळाचे पोर्टल जाणीवपूर्वक बंद ठेवले, ज्यामुळे हजारो मराठा तरुणांना फटका बसला आहे.
नरेंद्र पाटील म्हणाले की, “अजित पवारांकडे काही मागितलं की त्यांना वाटतं मी पैसे मागायला आलोय, त्यामुळे ते कायम चिडचिड करतात.” असं सांगत त्यांनी अजित पवारांवर थेट टीका केली. गेल्या एक महिन्यापासून महामंडळाचं पोर्टल बंद असल्याने सुमारे 15 हजार मराठा तरुणांचं नुकसान झालं, असा दावा पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला.
Narendra Patil: राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या माध्यमातून पोर्टल बंद पाडण्याचे कट कारस्थान
त्यांच्या म्हणण्यानुसार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांच्या माध्यमातून हे पोर्टल बंद ठेवण्याचं कटकारस्थान रचलं जात आहे. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संदेश पाठवला असून, मराठा समाज उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनाही याबाबत माहिती दिली असल्याचं सांगितलं.
Narendra Patil: पोर्टल बंद, तरुणांच्या भविष्यावर परिणाम
गेल्या 1 ऑक्टोबरपासून अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची वेबसाईट बंद आहे. त्यामुळे लाभार्थ्यांची नोंदणी, कर्जप्रक्रिया, पात्रता प्रमाणपत्र वाटप आणि व्याज परतावा यांसारखी सर्व कामं ठप्प झाली आहेत. दिवाळीच्या काळात अनेक तरुणांना व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज घ्यायचं होतं, वाहन खरेदी करायचं होतं, परंतु पोर्टल बंद असल्याने त्यांना ती संधी गमवावी लागली. फक्त नाशिक जिल्ह्यातच 16 हजारांहून अधिक तरुण लाभापासून वंचित राहिले आहेत. राज्यभरातील वंचित लाभार्थ्यांचा आकडा त्याहून कितीतरी पटीने मोठा असल्याचं अंदाज व्यक्त केला जात आहे.
Narendra Patil: सखोल चौकशी करण्याची मागणी
नरेंद्र पाटील यांनी असा आरोप केला की, महामंडळाच्या नावाने 300 ते 350 कोटी रुपयांपर्यंत निधी बँकांमध्ये ठेवला जातो, परंतु व्याजाचा परतावा लाभार्थ्यांना न करता बँकांमध्ये पैसे पार्क करून काही अधिकारी त्याचा फायदा घेत आहेत. या सर्व बाबींची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
Annasaheb Vikas Arthik Mahamandal : आतापर्यंतचा लाभ
दरम्यान, सन 2018 पासून आतापर्यंत नाशिक जिल्ह्यातील लाभार्थ्यांना 1,277 कोटी रुपयांचं कर्ज मंजूर करण्यात आलं असून, त्यावर 127 कोटी रुपयांचा व्याज परतावा देण्यात आला आहे. राज्यभरात आतापर्यंत सुमारे 4 लाख नोंदणीकृत अर्जदारांपैकी दीड लाखाहून अधिक लाभार्थ्यांना कर्ज मिळालं असून, महामंडळाने 1,037 कोटी रुपयांचा व्याज परतावा केला आहे.



