कर्जत नगर परिषद निवडणुक लढविण्या संदर्भात बहुजन वर्गातील पक्षात नीरव शांतता !
उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात.....
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –

कर्जत नगर परिषदेची निवडणूक आता ०२ डिसेंबर २०२५ रोजी होत असताना उमेदवारी अर्ज भरण्यास १० नोव्हेंबर रोजी सुरुवात झाली आहे . बहुजन समाजाची छत्रपती – फुले – शाहू – आंबेडकरी विचारांची ” मुव्हमेंट ” पुढे नेणाऱ्या राजकीय पक्षात ” नीरव शांतता ” दिसत असून निवडणूक लढविण्याच्या यंत्रणेत अद्यापी कुठलाच पक्ष आग्रही दिसून येत नसल्याचे चित्र येथे पहाण्यास मिळत आहे .
कर्जत नगर परिषद निवडणुकीत ” ओबीसी महिला ” हे थेट नगराध्यक्ष पदाचे आरक्षण पडले आहे , तर १० प्रभागात २१ उमेदवार निवडून जाणार आहेत . त्यात ११ महिला आरक्षण पडल्याने यावेळी कर्जत नगर परिषदेत महिला राज असणार आहे . गेल्या २०१४ साली ” राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ” तर २०१९ साली ” शिवसेनेची ” सत्ता असताना नागरिकांच्या समस्यां घेऊन कर्जत नगरीत वंचित बहुजन आघाडी , आझाद समाज पार्टी , स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष , बहुजन समाज पार्टी , या पक्षांनी व बहुजन युथ पँथर , स्वराज्य संविधान रक्षक पँथर सेना , या संघटनेने वेळोवेळी वाचा फोडली असताना सत्ता परिवर्तनाची आता संधी आलेली असूनही या पक्षात निवडणुकीचे उमेदवारी देण्यासंबंधी कुठेच नियोजन दिसत नाही . विशेष म्हणजे या सर्व पक्षांचे महाराष्ट्र प्रदेश , जिल्हास्तरीय अध्यक्ष , उपाध्यक्ष असे पदाधिकारी येथे वास्तव्यास असताना या पदाधिकाऱ्यांत देखील काहीच हालचाल दिसत नाही .
कर्जत नगर परिषदेत अनुसूचित जाती हे आरक्षण प्रभाग क्रमांक ०४(अ) महिला , प्रभाग क्रमांक ०८ (अ) दहिवली , प्रभाग क्रमांक १० (अ) गुंडगे हे तीन प्रभाग पडले आहेत , या प्रभागात मागील निवडणुकीत दहिवली प्रभाग सोडून आर पी आय पक्षाचे उमेदवार निवडून आलेले होते . आता या प्रभागात कुठले पक्ष उमेदवारी देतात , याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे . नव्याने झालेल्या प्रभाग रचनेनुसार या तिन्ही प्रभागात समस्या दिसत असून समस्यांसाठी गेल्या २ वर्षांत कर्जत नगर परिषदेवर मोर्चे , आंदोलने , उपोषणे झाली असताना व यांत नागरिकां बरोबरच बहुजन वर्ग असलेल्या पक्षांचा समावेश असताना आता मात्र निवडणुकीत उमेदवारी देण्यावरून दिसत असलेली ” नीरव शांतता ” कधी ” वादळात ” बदलणार ? याकडे सर्व बहुजन समाजातील मतदारांचे लक्ष लागून आहे .



