…….” दृष्टीहीन नागरिकांना सृष्टी दाखविण्याचे घुमरे मित्र मंडळाचा स्तुत्य उपक्रम “……
कर्जतमध्ये मोफत " नेत्र तपासणी व मोतीबिंद शस्त्रक्रिया शिबीरास " उत्स्फूर्त प्रतिसाद !

झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटलच्या सहकार्याने ” २६ ” वे शिबिर संपन्न……

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
आजकालच्या धकाधकीच्या जीवनात व सकस आहाराची वानवा असल्याने तर तासनतास टीव्ही व मोबाईल बघितल्याने डोळ्यांची दृष्टी कमकुवत होत आहे . कर्जत तालुका हा आदिवासी , कामगार , मोल मजुरी करणारे , असा बहुल भाग असल्याने अश्या गरीब – गरजवंत ” दृष्टीहीन ” नागरिकांना ” सृष्टी ” दाखविण्याचे महान कार्य घुमरे मित्र मंडळ गेली अनेक वर्षांपासून करत आहेत . घुमरे मित्र मंडळाने आयोजित केलेल्या व झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटलच्या सहकार्याने आज गुरुवार दिनांक ०६ नोव्हेंबर २०२५ रोजी कर्जतमध्ये २६ वे मोफत ” नेत्र तपासणी व मोतीबिंद शस्त्रक्रिया शिबीर ” सकाळी १०.०० ते दुपारी ०१.३० वाजेपर्यंत श्री कपालेश्वर मंदिर , लो. टिळक चौक, पोस्ट ऑफिस जवळ, कर्जत-रायगड येथे नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झाले . यावेळी १३३ च्या वर रुग्णांनी तपासणी केली . तर अनेकांना मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी पनवेल येथे पाठविण्यात आले .
” अंधारातून – प्रकाशाकडे ” नेण्यासाठी ” मोतिबिंदू मुक्त ” कर्जत तालुका अभियान अंतर्गत ” तिमिरा कडून तेजाकडे ” या स्तुत्य उपक्रमाद्वारे तालुक्यातील ज्येष्ठ नागरिक , महिला वर्ग व गरीब गरजू नागरिकांना मोतिबिंदू शस्त्रक्रिया करून डोळ्यांना ” कवच कुंडले ” देण्याचे काम ” घुमरे मित्र परिवारा ” कडून गेली २ वर्षांपासून केले जात आहे . आजच्या या धावपळीच्या जगात व आधुनिक आणि तंत्रज्ञानाच्या युगात ” डोळ्यांना ” अनन्य साधारण महत्त्व आहे . डोळ्यांना दिसणे कमी झाल्यावर त्यावर महागडी उपचार पध्दत तर मुंबई सारख्या ठिकाणी जाऊन उपचार घेणे न परवडणारे असल्याने घुमरे मित्र मंडळ हे गरीब गरजूंसाठी मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यासाठी ” वरदान ” ठरत आहेत. या शिबिरात पेशंटला तज्ञ डॉक्टरांकडून तपासून मोतीबिंदू ऑपरेशनसाठी जाण्याची, राहण्याची, जेवणाची व परत आणून सोडण्याची मोफत सोय केली जाते . या अनमोल कार्यात मा. नगरसेविका बिनीता घुमरे , मा. नगरसेवक बळवंत घुमरे आणि घुमरे मित्र मंडळ तन मन धन अर्पून हे देशव्यापी कार्य करत आहेत . त्यांच्या या कार्यात आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटलच्या टीमचे मोलाचे सहकार्य लाभते . भविष्यात महिलांच्या आजारांची तपासणी शिबिर आयोजित करून महिलांचे आरोग्य सुधारण्यासाठी मदत , व महिला सक्षमीकरणासाठी त्यांना रोजगार उपलब्ध करून स्वतःच्या पायावर सक्षम उभे राहण्यासाठी महिला बचत गटांच्या माध्यमातून संपर्क करून घुमरे मित्र मंडळातर्फे उल्लेखनीय कार्यक्रम राबविले जाणार असल्याचे बिनीता बळवंत घुमरे यांनी याप्रसंगी मत व्यक्त केले.
हे शिबिर यशस्वी करण्यासाठी मा. नगरसेविका सौ. बिनिता घुमरे , सरस्वती चौधरी , मा. नगरसेवक बळवंत घुमरे , ॲड. करण घुमरे , अरुण निघोजकर , विलास दांडेकर , श्रीनिवास राव , दिनेश गनेगा , मृणाल खेडकर , अरुण वायकर , छाया कुलकर्णी , मनोहर दांडेकर , तानाजी वाघमारे , आमिर मणियार आदींनी मेहनत घेतली .


