बदलापुर येथील ” माया ब्लड सेंटर ” च्या पहिल्या वर्धापनदिनानिमित्त ” रक्तवीर राजाभाऊ कोठारी ” सरांचा सत्कार !
भिसेगाव - कर्जत / सुभाष सोनावणे -

एकदा रक्तदान केल्याने तीन जणांचे प्राण वाचू शकतात , हा मूलमंत्र नागरिकांच्या मनात रुजवून रक्तदानाचे महत्व वाढवून गेली ३० वर्षात ५०० रक्तदानाचा पल्ला ओलांडून स्वतः १०० च्या वर रक्तदान करणारे ” सार्वजनिक रक्तदाते , रायगड भूषण तथा रक्तवीर राजाभाऊ कोठारी सर ” यांना रविवार दिनांक ०२ नोव्हेंबर २०२५ रोजी बदलापुर येथील ” माया ब्लड सेंटर ” च्या पहिल्या वर्धापनदिना निमित्त मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले .
आजकाल धावपळीच्या युगात , माणसांच्या खाण्यात बदल होत असल्याने आरोग्याची समस्या अनेकांना होत आहे. त्यातच आता रक्त वाढ होत नसल्याचे आजार मोठ्या प्रमाणात बळावले असल्याने लहानांपासून मोठ्या पर्यंत रक्ताची गरज भासत आहे , हा रक्त पुरवठा रक्तदान शिबिरातून सर्वांसाठी उपलब्ध करून देण्याचे ” महान कार्य ” गेली ३० वर्षे सार्वजनिक रक्तदाते राजाभाऊ कोठारी सर अंतःकरणा पासून करत आहेत . म्हणूनच अश्या थोर विभूतींचा सन्मान माया ब्लड सेंटरचे प्रमुख डॉ. हितेश पगारे व अजयजी भिसे यांच्या शुभ हस्ते शाल – श्रीफळ – पुष्पगुच्छ व भेट वस्तु देऊन करण्यात आले .
याप्रसंगी नेहमीच ” रक्तवीर राजाभाऊ कोठारी सर ” यांना या महान कार्यात सहकार्य करणारे व खारीचा वाटा उचलणारे कर्जत मधील उपस्थित विनोद पांडे , जयवंत म्हसे , अमिर मणियार , डॉ. प्रशांत सदावर्ते या सर्वांचा देखील शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी माया ब्लड सेंटरचे सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होता.



