Uncategorized

…..” आदिवासी संस्कृतीची ओळख अटकेपार “……

मांडवणेची " सविता पवार " टाटा स्टील फाउंडेशन संवाद - २०२५ फेलोशिप ने सन्मानित !

देशभरातून निवडलेल्या ” नऊ नवरत्नां ” मध्ये एक……

 

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – 

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या व देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांची भूमी असलेल्या रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील मांडवणे गावातील सविता दिलीप पवार हिस सामाजिक संशोधनात आणि आदिवासी संस्कृतीच्या दस्तऐवजीकरणात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करण्याने त्यांना नुकतीच ” टाटा स्टील फाउंडेशन संवाद फेलोशिप – २०२५ ” साठी राज्यातून एकमेव आणि अभिमानास्पद निवड झाली आहे . जमशेदपूर येथे झालेल्या राष्ट्रीय निवड प्रक्रियेत देशभरातील तब्बल ५७२ सहभागींमधून केवळ ” नऊ संशोधकांची ” अंतिम निवड झाली , त्यामध्ये ” सविता पवार ” यांनी आपले स्थान मिळवून महाराष्ट्राचे नाव ” उज्ज्वल ” केले आहे , तर ” आदिवासी समाजाची संस्कृती ” अटकेपार नेली .

ही फेलोशिप देशातील सर्वात प्रतिष्ठित, सन्माननीय आणि अत्यंत स्पर्धात्मक राष्ट्रीय फेलोशिप पैकी एक मानली जाते. ” आदिवासी समाज – त्यांचे जीवनविश्व – परंपरा – कला – लोककथा – ओळख – भाषा आणि सांस्कृतिक वारसा ” यांचे संरक्षण आणि संवर्धन करणाऱ्या तरुण संशोधकांना राष्ट्रीय पातळीवरील व्यासपीठ आणि आर्थिक/अकादमिक आधार या फेलोशिपतर्फे दिला जातो. त्यामुळे या कार्यक्रमासाठी निवड होणे हे कोणत्याही संशोधकासाठी अत्यंत मानाचा आणि करिअरला दिशा देणारा टप्पा असतो.

    निवड प्रक्रियेदरम्यान ज्युरी समितीत विविध नामांकित विद्यापीठांचे तज्ज्ञ, आदिवासी अभ्यासक, सामाजिक संशोधन क्षेत्रातील वरिष्ठ प्रमुख, तसेच टाटा स्टील फाउंडेशनचे अनुभवी प्रोग्राम डायरेक्टर सहभागी होते. त्यांनी प्रस्तुतीकरणाची मौलिकता, सामाजिक परिणाम, समुदायाशी असलेला थेट संबंध, संशोधनाची विश्वसनीयता आणि दीर्घकालीन परिणामकारकता यावर विशेष भर दिला. या सर्व निकषांमध्ये सविता पवार यांचे कातकरी आदिवासी समाजाच्या सांस्कृतिक जतन व संवर्धन विषयावरील कार्य अत्यंत प्रभावी ठरले.

सध्या छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठात MSW (पहिले वर्ष) शिक्षण घेत असलेल्या सविता पवार यांनी आपल्या क्षेत्रातील अभ्यासात स्थानिक इतिहास, परंपरा आणि आदिवासी समुदायांच्या सांस्कृतिक संपदेवर सातत्याने कार्य केले आहे. त्यांच्या या यशामागे कोकण ज्ञानपीठ, कर्जत कॉलेजच्या प्रा. डॉ. सुजाता कुलकर्णी यांचे शैक्षणिक मार्गदर्शन आणि चैत्रा देशपांडे यांचे संशोधन सल्लामसलत अमूल्य ठरली आहे.

महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्याच्या कर्जत तालुक्याच्या मांडवणे या एका छोट्याशा गावातून देशपातळीवरील अशा प्रतिष्ठित मंचावर निवड होणे , हे राज्यातील तरुणांसाठी प्रेरणादायी उदाहरण आहे. विशेषतः ग्रामीण आणि आदिवासी भागातील आवाजांना राष्ट्रीय व्यासपीठ मिळवून देणारी ही उपलब्धी महाराष्ट्रातील सामाजिक संशोधन क्षेत्रासाठी मोठा सन्मान आहे. सविता पवार या ” रत्नाचा ” त्यांच्या यशाचे कौतुक विद्यापीठातील प्राध्यापक, विद्यार्थी, संशोधक, तसेच कर्जत तालुक्यात , मांडवणे गावापासून ते संपूर्ण रायगड जिल्ह्यातील नागरिकांनी अभिमानाने व्यक्त केले आहे. ही निवड केवळ त्यांची वैयक्तिक उपलब्धी नसून संपूर्ण महाराष्ट्राच्या ” सांस्कृतिक वारशाचा ” मान वाढवणारी ऐतिहासिक कामगिरी ठरली आहे . सविता पवार यांच्या या ” अनमोल कार्याला ” सर्व क्षेत्रातून ” अभिनंदनाचा ” वर्षाव होत आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!